Skip to main content

भेट

   

गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी मैत्री ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल काही ओळी आहेत 


                                  "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे
  अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"

       ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते.

       भेट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन माणसांनी एकमेकाला प्रत्यक्ष भेटणं..आता अशा कितीतरी भेटी आपण लहानपणापासून अनुभवत आलोय. त्यात लाडक्या, मैत्रीपूर्ण, सक्तीच्या, प्रेमाच्या, औपचारिक, अप्रिय अशा सगळ्या प्रकारच्या भेटींचा समावेश आहे. हल्ली तर virtually च आपण एकमेकांना इतके भेटतो की खऱ्या भेटींची ओढ,त्यातला हळवेपणा, त्यामागची तयारी, परत भेटेपर्यंत आधीच्या भेटीच्या जपलेल्या आठवणी हे ह्या पिढीतच हरवून जाईल असे मनात येऊन जाते. पण तरीही प्रत्यक्ष भेटींना अजूनतरी आपल्या आयुष्यात  खूप महत्व आहे. 

       आता मला असे वाटतं,दोन जवळची माणसे जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा प्रत्यक्ष भेटीच्या आधीच त्यांची एक मानसिक भेट होतं असते. दोघांच्याही त्या भेटीतून काही अपेक्षा असतात, काही असं असतंच कि जे त्यांना त्या भेटीत हवं असतं म्हणजे काय तर अगदी साधे उदाहरण घेतलं तर नवीन लग्न झाल्यावर खूप दिवसांनी माहेरी चाललेल्या लेकीचं आईशी अगदी रोज फोनवर  बोलणं होत असलं तरीही आई भेटेल तेव्हाचे चार क्षण आम्ही अमुक ठिकाणी बसू, अशा गुजगोष्टी करू मग मी आईला हे सांगेन, तिच्याबरोबर एकट्यानं वेळ घालवेन अशा अनेक कल्पनांसह ती माहेराला भेट देते...तिच्या बाबांना तिला ती नवीन काही करायला शिकलेलं खाऊ घालायचं असतं. तिच्यासाठी कधी कधी तिला बाकी कोण भेटलं, ती कुठे फिरायला गेली ह्या सगळ्यापेक्षा हे सगळ्यात महत्वाचं असतं.आता असा  वेळ मिळाला की ही तिच्या दृष्टीने खरी परिपूर्ण भेट होते.

      असे एकमेकाच्या मनात ठरवलेलं जेव्हा घडतं तेव्हा दोघांसाठीही ती भेट पूर्ण भेट होते...पण काही वेळा आपण अनुभवतो की भेट होऊनही मनात एक Incompleteness चा feel रहातो. भेटलो तर खर, पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत. असं होतं तेव्हा एकतर आपण जे ठरवले ते त्या भेटीत घडत नाही, काही वेळा ती सहज नसते, दोन माणसांच्या त्या भेटीतल्या अपेक्षा एकमेकापेक्षा अगदी वेगळ्या असतात, ती पूर्वी जशी होती तशी आता एकमेकांशी संबंधित राहिलेली नसतात त्यांच्या नात्यात,स्वभावात खूप बदल झालेला असतो किंवा खूप वेळा अशा भेटींना काही उद्देशच नसतो. आता प्रत्येक भेटण्यामागे काही कारणच  असावं का? तर असं मुळीच नाही पण ती परिपूर्ण, आनंददायक होते तेव्हा  मात्र काही वेळा त्यात काही  गोष्टी सहज असतात अथवा तशा  ठरवून आणल्या तरी आपण ती जास्त  छान करू  शकतो.

      दोन संगीतकार,दोन कलाकार,दोन विचारवंत अथवा कोणत्याही समान विषयाची आवड असणारे एकत्र येउन जेव्हा त्यावर भरभरून बोलतात, आपली अनुभवांची शिदोरी खुली करतात तेव्हा ती  भेट फ़क्त त्यांच्यासाठीच नाहीं तर पहाणारया, त्या विषयाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी आनंददायक असते. पण तितकेच दोन जूने मित्र जेव्हा अगदी सहज  काही न ठरवता एकमेकाला भेटतात तेव्हा अशी सहज भेटही आठवणींचा, उत्साहाचा झरा होऊन वहाते... आणि आता परत कधी भेटू  असे वाटून जातं?

     काही वेळा असही होतं की पूर्वी खूप जवळचं वाटणारं एखाद्याबरोबरच नातं आता समोरच्या माणसाला तितकंसं महत्वाचं राहिलेलं नसतं तेव्हा ती भेट एकांगी होते कारण मुळात भेटीची ओढच एकांगी असते.अशा भेटी मात्र त्रासदायक ठरू शकतात आणि काळानुसार त्या जमल्या तर जरूर टाळाव्या. पण तेव्हा मनातलं त्या माणसाबद्दलच प्रेम. नातं तितकंच जिवंत ठेऊन आपण  "आपल्याला भेटावसं वाटलं ना, म्हणून आपण आलो" असे समजून अगदी समाधानाने ती भेट पूर्णही करू शकतो....प्रतिक्रियेच्या कोणत्याही अपेक्षेशिवाय..कारण ते आपल्या मनासाठी काही वेळा आवश्यक असतं, त्याने मन मोकळे रहाते अन नाते तुटत नाही  ते मिटून जाते छान आठवणींसकट.. आपल्या बाजूने ते तसे मिटू द्यावे आणि निवांत व्हावे.

      सध्याच्या धावपळीच्या आणि पूर्ण व्यस्त दिनक्रमात तर आपण एकमेकाला क्वचित भेटतो, खूप सवड काढून भेटतो तर अशा वेळी तर ही भेट छान व्हावी म्हणून काही गोष्टी नक्कीच पाहाव्या असे वाटतं.पूर्वी लहानपणी आईबाबा काही वेळा मुलांना सांगयचे की त्यांच्याकडे ना तुला नाही आवडलं तरी आपल्याला जायचंय, ते आपले ******कोणी लागतात बर का..त्यांच्याकडे जाऊन जे काही छान छान येतं ते म्हणायचं, तोंड वाकडं करायचं नाही इत्यादी इत्यादी...अशा काही नावडीच्या वा सक्तीच्या  भेटींचा अनुभव आपण लहानपणी घेतलेला असेल☺ व्यवहाराच्या दृष्टीने त्या आवश्यकही असतील, पण मोठं झाल्यावर मला नक्की असं वाटलं एकमेकाला सतत मागे नाव ठेवणाऱ्या, दुसऱ्याच्या प्रगतीबद्दल मनापासून खेद वाटणाऱ्या, आपल्या जीवनत्तत्वांशी अथवा मूल्यांशी अजिबात match न होणारया अशा लोकांकडे ते अमुक-तमुक लागतात म्हणून फक्त वेगवेगळी घरं घेत बसण्याने नक्की कोणाला छान वाटतं हा विचाराचाच मुद्दा आहे आणि वाटत नसेल तर अशा भेटी-गाठी मोठे होऊन सतत आपण का करतो? आणि त्यातून काय मिळत?

      मला एक प्रसंग आठवला मध्यंतरी एका  कौटुंबिक get-together  मधे काही जण जमलेले असताना अचानक एक जण म्हणाली,"अरे आपण इतके लोकं एकत्र जमलोय,काहीतरी संकल्प करूयात ना?" कोणीतरी म्हणाले कसला? तर ती म्हटली  काहीतरी चांगले करायचा, ते आपल्या आवडीचं काहीही असेल पण आपण परत पुढल्या वर्षी भेटू ना, तेव्हा एकमेकाला विचारू काय काय ठरवलं होतं, त्यातलं काय काय झालंय. मला ह्या विचाराचाच प्रचंड कौतुक वाटलं. जेव्हा एकाहून अधिक लोकं भेटतात तेव्हा सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवले, तर त्यात एक टीम स्पिरीट असतं, एक उत्साह असतो जो भेटणाऱ्या सगळ्यांना मिळतो आणि तो घेऊन निघता येतं. नाहीतर फक्त खाण्या-पिण्यासाठी आणि देण्या-घेण्यासाठी काही आपण एकमेकाला भेटत नसतो.भेट किवा भेटणे हे त्यापलीकडचे झाले तरच ती भेट विशेष होते.

      थोडक्यात काय  भेट जितकी सहज होईल तितकी आनंद देईल, काही वेळा वैचारिक समाधान देईल, कधी आठवणीना उजाळा देईल,कधी भावनिक आधार असेल,कधी एकमेकाला मदत असेल,कधी अशा भेटीत  आपणच आपल्याला नव्याने समजुन घेऊ, कधी नाती उलगडून पाहू, कधी आयुष्याकडे कुतूहलाने पाहू  पण भेटणारया माणसांना ती आल्हाददायक अशी झाली पाहिजे... खोलवर उतरत गेली पाहिजे आणि मनात भरून राहिली पाहिजे पुढल्या प्रवास करताना एक छानशी आठवण होऊन  "Departures are always painful" असे म्हणतात पण अशा परिपूर्ण भेटी झाल्या, तर निघणं भरीव होईल, जगणं  सुंदर होऊ शकेल,अन तेव्हा असे भेटणं हे  प्रत्येकाच्या आयुष्याला एक  छोटीशी "भेट" देऊन जाईल परत भेटेपर्यंत........!!

भेटू लौकरच:)



-कल्याणी बोरकर

कल्याणी बोरकर यांचा नजर हा काव्यसंग्रह इथे घेऊ शकता "नजर कवितासंग्रह"

Comments

Popular posts from this blog

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर

Warm welcome

Its a long time we are connected and I would like to thank each one you for your encouragement and support online as well as offline :) Its really a wonderful journey for me so far.Me and my husband Gaurish started a blog and then converted it into website www.prosperitynjoy.com four years back to express ourselves in our areas of interest and with the grace of God we are quite successful in running this blog over these years.We thought that, now the time has come to create different blogs for different interests, to invite more audience of similar interest and to discipline the website which has variety of content as of now. So I have created my own blog kalyanismusings.blogspot.com to express myself which will be part of our main website www.prosperitynjoy.com. In coming time I am going to share few reviews received on my book of Marathi poetry with you all along with my freshly penned poems. As a finance professional, I am also planning to post and discuss some financial

आजोबा

आजोबांच्या खोलीत आता धुकं..धुकं...धुकं... आजोबांचं जग सगळं मुकं...मुकं...मुकं.. .. ही मंगेश पाडगावकर यांची " नसलेल्या आजोबांची असलेली कविता " जेव्हा पहिल्यांदा वाचनात आली होती,  तेव्हाही कविता वाचता वाचता खूप भरून आले आणि असे कध्धी होऊ नये असे वाटले, आज ही गोष्ट खरी आहे आणि खरच खूप भरून आलंय.३१ जानेवारी २०२० ला आजोबांना म्हणजे माझ्या बाबांच्या  बाबांना ९२ व्या वर्षी  देवाज्ञा झाली आणि ह्या १२ दिवसात दोनदा रत्नागिरीला गेल्यावर कित्येक आठवणी मनात फेर धरत राहिल्या, सगळे बालपणच जणू परत जागं होऊन भोवताली दिसत होतं..लाडक्या आजोबांच्या काही आठवणी आज जमतील तशा मांडणार आहे. लहानपणी मी आमच्या घरच्या नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी त्यामुळे आजोबांची सर्वात लाडकी नात  होते लाडाने ते मला कल्याण म्हणत असतं आणि मी दिसले की 'कल्याण करी रामराया' हे गाणं गुणगुणत, .त्यांची अतिशय  लाडकी लेक  म्हणजे  माझी आत्त्या 'वर्षा' जी ठाण्याला असते.... तिची त्यांना आठवण  येत असली की मलाच ते कधीकधी कल्याण ऐवजी  'वर्षाराणी' म्हणून हाक मारायचे आणि म्हणायचे 'अरे मला वाटले व