Skip to main content

आजोबा


आजोबांच्या खोलीत आता
धुकं..धुकं...धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं....

ही मंगेश पाडगावकर यांची "नसलेल्या आजोबांची असलेली कविता" जेव्हा पहिल्यांदा वाचनात आली होती,  तेव्हाही कविता वाचता वाचता खूप भरून आले आणि असे कध्धी होऊ नये असे वाटले, आज ही गोष्ट खरी आहे आणि खरच खूप भरून आलंय.३१ जानेवारी २०२० ला आजोबांना म्हणजे माझ्या बाबांच्या  बाबांना ९२ व्या वर्षी 
देवाज्ञा झाली आणि ह्या १२ दिवसात दोनदा रत्नागिरीला गेल्यावर कित्येक आठवणी मनात फेर धरत राहिल्या, सगळे बालपणच जणू परत जागं होऊन भोवताली दिसत होतं..लाडक्या आजोबांच्या काही आठवणी आज जमतील तशा मांडणार आहे.

लहानपणी मी आमच्या घरच्या नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी त्यामुळे आजोबांची सर्वात लाडकी नात  होते लाडाने ते मला कल्याण म्हणत असतं आणि मी दिसले की 'कल्याण करी रामराया' हे गाणं गुणगुणत, .त्यांची अतिशय  लाडकी लेक  म्हणजे  माझी आत्त्या 'वर्षा' जी ठाण्याला असते.... तिची त्यांना आठवण  येत असली की मलाच ते कधीकधी कल्याण ऐवजी  'वर्षाराणी' म्हणून हाक मारायचे आणि म्हणायचे 'अरे मला वाटले वर्षाच आहे' .... त्याची मला फारच  गंमत वाटायची.. लहानपणी शाळा हा मला न आवडणारा प्रकार आणि शाळेत जाताना मला टाटा करायला आजोबा उभे असले की, मी वळून वळून त्यांच्याकडे पहायचे आणि मग  मला शाळेत अजिबात जाऊच नये असे आणखीच वाटायचे.आजोबा हे अतिशय शिस्तप्रिय, स्वतःच्या सगळ्या वस्तू टापटीप आणि जागेवर ठेवणारे होते,त्यांची  कामाची जागा, लिहिलेल्या वह्या सगळे कसे व्यवस्थित असे, वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी कॉम्पुटर शिकायला सुरुवात करून ते तो नीट handle करत होते,  त्यांच्या स्टेशनरी मधल्या शाईच्या पेनांचे मला शाळेत असताना फार अप्रूप होतं आणि त्यांनी वापरून नीफ गुळगुळीत झालेली पेनं आम्ही बहिणी त्यांच्याकडून मिळवत असू तेव्हा मोठ्ठा खजिना सापडल्यासारख वाटे.. त्यांच्या ह्या सगळे जागच्या जागी ठेवण्याच्या मागची प्रेरणा म्हणजे त्यांची आजी होती आणि तिने आजोबांना शिकवलेला तिचा एक छोटासा नियम ते नेहमी आम्हाला म्हणून दाखवत,"जिथल्या तिथे आणि वेळच्या वेळी" तो जणू त्यांच्या आयुष्यातला यशामागाचा महत्वाचा मंत्र होता ,ते खालच्या मजल्यावर कामाला  बसत तेव्हा  खूप वेळा आम्हाला  काही आणायला सांगायचे -" हे बघ वरच्या खोलीत दुसऱ्या कपाटात  ना तिसऱ्या कप्यात डावीकडे तुला अमुक एक गोष्ट मिळेल ती घेऊन ये "आणि ती वस्तू अगदी तिथेच सापडायची...मी ती जागेवरची वस्तू घेऊन आल्यावर.. ते फक्त हसायचे आणि मला वाटायचे ह्यांचे कसे काय सगळे जागेवर असते बुवा? (हा माझ्या आयुष्यातला प्रश्न अजूनही सुटलेला नाही :) ) अजूनही एक गोष्ट ते येता जाता म्हणत आणि  जी त्यांच्या वागण्यातही  कायम असे ती आम्हाला त्यांच्या आवाजात  आजही तशीच आठवते....

"खोटं कधी बोलू नये
चोरी कधी करू नये
पाहिले ते मागू नये
कुणासंगे भांडू नये"


त्यांचे वाचन अफाट होतं, पाठांतरही अचंबित करणारे होते आणि तितकाच पुस्तकांचा खजिना त्यांच्याकडे होता..ते उत्तम बुद्धिबळ खेळायचे, त्यांना विनोदाची उत्तम जाण होती आणि अगदी शेवटपर्यंत त्यांच्या बोलण्यात विनोद होता, ते अतिशय तालासुरात गाणी म्हणायचे .. लहानपणी वेगवेगळी स्तोत्र आमच्याकडून, आजी आजोबानीच पाठ करून घेतली होती ,ते मला पावकी -निमकीही म्हणायला लावायचे,काही दिवस वैदिक गणिताचे धडेही आम्ही  आजोबांकडेच गिरवले होते..आणि मग त्याला दांडी मारली होती :)..आम्ही तिघी बहिणी आणि आजोबा असा एक घरातील विशेष वर्ग "शक्तिमान, अलिफ लैला, रामायण ह्या सारख्या सिरीयल पाहणारा आणि विशेष करून क्रिकेट ची match पहात खाऊ खाणारा एक महत्वाचा रसिक वर्ग होता आणि ह्या काळात आम्हाला कोणीही हाक मारू नये अशी घरच्यांना ताकीद असे...जेवायला बसल्यावर ते कधी कधी भाकरीवर मस्त तूपाची धार सोडून त्यावर मीठ भुरभुरवून देत आणि आमची नावडत्या भाजीतून सुटका करत असतं..आणि आईला म्हणत.."अग खाऊ दे आज त्यांना मोनाकोचे बिस्कीट" (तूप मीठ लावलेली भाकरी) हाच आमचा ग्रुप संध्याकाळी धुरीमध्ये कांदे बटाटे भाजणे, कधीतरी वडापाव आणून खाणे ,संध्याकाळी आईला आवडीचे काहीतरी ठरवून करायला सांगणे आणि त्यात इतर वेळी  आम्हाला न  मिळणारा  maggi सारखा पदार्थही 'आज आजोबा पण खाणारेत' म्हणून आईला करायला लावणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, गच्चीवर तारे पहात झोपण्याचा plan आखणे आणि त्यासाठी जंगी तयारी करणे, आजोबांच्या डोक्याला तेल मॉलिश करणे असे  अनेक उपक्रम चालवत असे.

आमचा  सगळ्यात लाडका सुट्टीतला कार्यक्रम  म्हणजे मे महिन्यात आमच्या  आत्तेबहिणी आल्या की आजोबांना गोष्ट सांगायला लावणे आणि त्या गोष्टीत आज कोण कोण हवे हे आम्ही बहिणी आयत्या वेळी त्यांना सांगायचो ..अगदी काहीही ....आज चेटकीण हवीय ,आज हत्ती आणि उंट हवेत, गोष्टीतल्या मुलीचे नाव हे असू दे...आज गोष्टीचा शेवट छान हवा .... असे काहीही आणि लगेच ती सगळी पात्र त्या गोष्टीचा भाग बनवून आजोबा एक अतिशय रंजक अशी गोष्ट ऐकवायचे... अशा कितीतरी सुंदर गोष्टी आजोबांकडून ऐकणे हा माझ्या बालपणातला सगळ्यात आवडीचा भाग होता.

 आजोबा मूळचे ठाण्याचे आणि कामानिमित्त रत्नागिरीला स्थायिक झालेले..व्यवसायाने करसल्लागार.. त्यांना बहुतेक बाहेरचे सगळे लोकं हे वैद्य काका किंवा बाळासाहेब वैद्य  ह्या  नावाने ओळखत असतं..अतिशय टापटीप ,नीटनेटकं आणि सर्वांशी मैत्री असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व....परक्या शहरातून येऊन रत्नागिरी जिल्ह्यात काम वाढवताना त्यांनी अगणित माणसं जोडली,प्रचंड कष्ट केले, कामासाठी जाणाऱ्या प्रत्येक  गावात त्यांचे हक्काचं असं एक तरी घर असे जेथे ते कोणाचे भाऊ, कोणाचे मामा अशी अनेक नाती नव्याने जोडत.व्यवसायाबरोबर  सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले तेव्हा, जिल्हा संघचालक ,विभाग संघचालक, डॉ. हेडगेवार स्मारक  समितीचे अध्यक्ष अशी पदे सांभाळली..आणिबाणीत १८ महिने   तुरुंगवासही भोगला.... त्याच काळात माझ्या वडिलांनी कामाची जबाबदारी हातात घेतली आणि तितक्याच तळमळीने आणि कष्टाने व्यवसाय  खूप वृद्धिंगत केला... आमच्या लहानपणी वर्षाचे जवळजवळ दोन त्रितीयांश दिवस बाबा व्यवसायाच्या निमित्ताने फिरतीवर जात असतं...आजोबा आणि बाबा यांची कामाची पद्धत खरंतर खूप वेगळी होती, सवयींमधेही फरक होता .पण व्यवसाय हा नेकीने आणि आजुबाजुच्या लोकांना मैत्रीने त्यात सामावून घेऊन करता येतो आणि हे कोणताही दिखावा, गवगवा अथवा मोठेपणाचा आव न आणता अगदी सहजरित्या करता येतं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आणि दोघांच्यातही कॉमन होतं. जेव्हा नवीन शहरात  मी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतेय तेव्हा हेच दोघं पथदर्शी होतात. व्यवसायातून अर्थार्जन करताना समाजासाठी काहीतरी करावं हा विचार आजोबांच्या सतत मनात  होता आणि त्यासाठी त्यांना आजीची आणि घरातल्या सगळ्यांची साथ होती त्यामुळेच त्यांचे आयुष्य संकुचित राहिले नाही तर भरीव झाले आणि त्याला एक सर्वसमावेशक उद्देश प्राप्त झाला.

सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्याची त्यांना खूपच आवड होती,आमच्याकडे कुणी इतर आणि विशेष करून संघाचे पाहुणे येणार असले की आईला ते आवर्जून " काय मेनू करणारेस? काय तयारी केलेयस?" हे विचारायचे आणि आईने एकदा सांगितले की सगळे व्यवस्थित होईलच असे लक्षात घेऊन निवांत व्हायचे.आजोबांच्या लोकांना खाऊ घालण्याच्या हौसेला विशेषतः त्यांच्या सूनेची म्हणजे माझ्या आईची आणि आजीची अनेक वर्ष जोरदार साथ मिळाली त्यामुळे खूप पाहुणे आणि त्यांचा पाहुणचार  हा आमच्या  लहानपणीच्या आठवणीतला एक महत्वाचा आणि अविभाज्य  भाग आहे , सगळ्यांना  उपयोगी पडतील अशा छोट्या छोट्या गोष्टी आणून त्यांना त्या देणे हाही आजोबांचा एक आवडीचा भाग होता आणि त्या वस्तू त्या माणसाने घेतल्यावर, त्याला उपयोग झाल्यावर त्यांचा चेहरा अगदी खुलून जायचा,ते पाहण्यासारखं होतं

 एक अतिशय सुंदर, संस्कारित आणि निरागस बालपण  आम्हाला आई-बाबा आणि  आजी-आजोबांबरोबर घालवता आलं  हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल.आम्ही लहान असताना आजोबांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाची आम्हाला काहीच कल्पना नव्हती,  कारण आमच्या बरोबर ते खरच लहान होऊन वावरत असतं...त्यांनी प्रथितयश करसल्लागार म्हणून यश मिळवलेच, राष्ट्रीयत्वही जोपासले पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन उतार वयात त्यांनी केलेली एक गोष्ट आम्हा सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी ठरली आणि ती म्हणजे जाण्या अगोदर साधारण ६ ते ६.५ वर्ष आजोबा  बऱ्यापैकी bed ridden होते म्हणजे  अगदी  मोजक्याच कामांना उठायचे ,तेव्हा  ह्या पूर्ण काळात एकदाही ते :मी कंटाळलोय, थकलोय म्हणाले नाहीत, कसलीही तक्रार त्यांनी केली नाही..कधीही कुणी भेटायला  गेलं आणि त्यांना विचारले की आजोबा कसे आहात ...की  ते म्हणायचे "मी एकदम first class आहे" हे फारच विलक्षण होतं सगळे व्यवस्थित सुरु असतानाही कोणी हा प्रश्न विचारला की आपण म्हणतो "तसे सगळे ठीकचं आहे पण............xxxx....." :)

आणि हे अशा कंटाळवाण्या परिस्थितीत इतकं छान उत्तर देतातं आणि मनस्थिती एवढी Positive ठेवतात हे शिकण्यासारखं होतं.....त्यांचे यश, त्यांचे कर्तृत्व,त्यांचे सामाजिक काम, त्यांचे समाजातील स्थान, सारे सोडून एका वेगळ्या प्रवासाला जायला ते मनाने खूप लौकरच तयार झाले होते.. तेही नाईलाजाने नाही... तर समजून उमजून... त्या सगळ्यातून सहज मोकळं होतं..

माणूस जातो म्हणजे तरी काय ? चेतना,जी काल शरीरात होती.. ती आज नसते बसं इतकच तर होतं... पण चेतना गेल्यावरचं शरीर पाहिलं की लक्षात येतं, चेतनाच तर सगळं काही  आहे .....नाहीतर ह्या शरीराच्या आत चेतना नसताना त्याच्या असण्याला  काहीच अर्थ राहिला नाहीये...कोणी ह्याला अध्यात्म म्हणेल ,कोणी ह्याकडे logically पाहिलं.... पण जगणे जसे आनंदी झाले पाहिजे....तितकंच जाणही सहज आणि आनंदात असलं पाहिजे असे तर आपल्याला सगळ्यांना मनातून वाटतं असतं आणि तो सहज निघण्याचा सोहळा... आनंदात ....कोणतीही अपेक्षा, तक्रार मागे न ठेवता  ते करू शकले हे मला त्यांच्या आयुष्यात सगळ्यात भावलं .. आणि 'हे'आपल्याला जमलं पाहिजे असे मनोमन खूपदा वाटून गेलं... 

आणि आज घरी आल्यावर सहज पुस्तक उघडलं तर त्याच कवितेतल्या काही पुढच्या ओळी जसे काही ..आजोबांवरच लिहिल्या आहेत आणि तेच मला सांगत  आहेत असे वाटलं:

"आजोबा आपल्याच नादात 
स्वतःशीच गात असतं,
गाता गाता मधेच थांबून,
स्वतःशीच गोड हसत!

मी जवळ गेले की मला म्हणत:

बेटा एक लक्षात ठेव:
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे!"


आजोबा जिथे कुठे असतील नक्की आनंदात असतील कारण एकटं जाण्याची आणि स्वतःशी गाण्याची कला त्यांनी इथे असतानाच साध्य केली होती, कर्म तर उत्तम केलं होतंच त्यामुळे समाधानी असतील असाही विश्वास वाटतोच ...त्यांच्यातील जे जे आवडलं... पटलं.. मला भावलं त्या मार्गावरून जाण्याचा माझा  प्रयत्न हीच त्यांची खरी आठवण ठेवणं असेल आणि ते आम्ही नक्कीच करू....तरीही तुम्ही सतत खूप  खूप आठवाल आजोबा........!!


-तुमचीच लाडकी कल्याण-



Comments

  1. Khup sundar lihilayas vahini....Ekdam manala bhavanara��

    ReplyDelete
  2. ती.काकांची एक वेगळी आठवण म्हणजे मी संघाचे प्रथम वर्ष -संघ शिक्षा वर्ग पुण्याला बहुदा 1974 मध्ये केले.त्यावेळी आमच्या बरोबर ती.काका पण होते. ती.काकांचे बोलणे खूप गोड व विनोदी होते.त्यांनी मागवलेला रत्नागिरी हापूस आंबा आमच्या खोलीतील सर्वांना त्यांनी जवळ बोलावून आग्रहाने दिला होता तो इतक्या वर्षांनी आजही आठवणीत राहिला आहे.------प्रकाश नातू, चिपळूण

    ReplyDelete
  3. आजोबांच्या प्रेमळ आठवणी...एक वेगळा पैलू उलगडलास!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते....

नजर

              डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.                  नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी...

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर