Skip to main content

नजर

     
       
डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.
               

नजर

अशी एक नजर जिने केला कहर
भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर

अशी एक नजर जिने केला कहर
भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर

अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर
कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर

अशी एक नजर जिने केला कहर
पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ

अशी एक नजर जिने केला कहर
झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर

अशी एक नजर जिने केला कहर
मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर

अशी एक नजर जिने केला कहर
इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर

अशी एक नजर जिने केला कहर
केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर

अशी एक नजर जिने केला कहर
अमानवी इतकी, काटा येई अंगावर

अशी एक नजर जिने केला कहर
करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर

अशी एक नजर भिरभिरती चंचल
न थारा आकाशी न टिके ती भुईवर

अशी एक नजर जिने केला कहर
नजरेतून मिळालं नेमकं हवं उत्तर

अशी एक नजर त्यात फक्त कुतूहल
सारी गोड प्रश्नचिन्ह एकवटली क्षणभर

अशी एक नजर जिने केला कहर
"काय चूक झाली सांग ना ?" मागत राहते उत्तर

अशी एक नजर जिने केला कहर
दिसत नाही कुठे पण सगळीकडे वावर

अशी एक नजर डोळे लावलेली वाटेवर
जिच्यासाठी फक्त गाठावं वाटतं रोज घर

अशी एक नजर हरवलेली दूरवर
गहिऱ्या विचारांत गढून राहिलेली खोलवर

अशी एक नजर फिदा झालेली मरणावर
डाव आर्धा सोडत निघालेली सरणावर

अशी एक नजर जसं शून्य शून्यावर
उध्वस्त जग, एकाकी भकास स्वर

अशी एक नजर जसा शांतीचा सागर
जिला पाहता ऐकू येई अंतरातील स्वर

अशी एक नजर जिने केला कहर
भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर


-कल्याणी बोरकर

Comments

Popular posts from this blog

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते....

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर