Skip to main content

बाळंतपण

बाळंतपण!

बाळंतपण-आई होणं हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा, हळवा पण आनंद देणारा, तिचे सगळे जग बदलून टाकणारा अनुभव असतो.ह्या बाळंतपणावरची ही खट्टी मिठी कविता.




नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख
आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख

ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण
आई म्हणाली पूर्ण झाला बाळंतपणाचा पण

वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार
काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार

पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं
कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसतं

कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास
सेंट आणि deo कुठले नुसता ‘शी’ आणि ‘शु’ चा वास

हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त
सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास

कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास
कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas

जेवण केलय आज आईने आवडीचे खास
पण सूर ह्याने काढला की माझा अडकतोय घास

त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस
हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस

डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस
दिवे लागणी झाली आता बाहेर नको जाऊस

कुणी म्हणे लागली असेल त्याला दृष्ट
काढून टाक एकदाची इडा पिडा होऊ देत नष्ट

सांभाळ बाई त्याला खूप आहेत infection
देऊन आणलंस का ग त्याला वेळेत injection

बाटली नको तिला चमचा वाटीच बरी
नीट लक्ष दे ती आहे आमची परी

मला ही ठाऊक आहे ह्या सूचनांमागचे प्रेम
म्हणून तर शक्यतोवर माझा नं बोलण्याचा नेम

पण मन मोकळं केलं माझं तर आईबाबांचे दुखावते
आणि अगदीच नाही केलं तर बोलतात त्यांचे फावते

मलाही हवे वाटतात आत्ता माझेच आई आणि बाबा
तुम्ही आधी माझे अन् मगच त्याचे आजी आणि आबा

कालपर्यंत होते मी कशी अगदी independent
पण अचानक आले कुणीतरी जे माझ्यावरती dependent

उठणं बसणं सारे माझे जोडलेलं त्याच्याशी 
कित्तीतरी दिवसात मी आले नाहीच माझी माझ्यापाशी

लाड करता तुम्ही सगळे जरी बाबा मावश्या आणि ताई
गांगरून गेलेय मी खरच त्याची नवखी आई

हळवी झाले गांगरले तरी माघार घेणार नाही
वेळ थोडा जाऊ दे फक्त नका करू घाई

अवघड असली तरी जबाबदारी आहे ही प्रेमळ
आणि पिल्लासाठी येतच नं शेवटी आईच्या पंखात बळ

मलाही कळू लागलेत हळूहळू त्याच्या रडण्याचे अर्थ 
आणि दिवसागणिक होतेच आहे मी आई म्हणून समर्थ

अजून द्यायचेत त्याला संस्कारांचे धडे 
गिरवून घ्यायचेत अक्षर आणि घोकून घ्यायचेत पाढे

प्रवास इथून तर सुरु होतो इथे संपत नाही
पण कळून चुकत इतकं सोपे नसते होणं आई!


-कल्याणी बोरकर-

Comments

Popular posts from this blog

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते....

नजर

              डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.                  नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी...

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर