Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

कॉपी -राईट?

कॉपी -राईट? अवघ्या काही लाईक्ससाठी त्यानं खरं लपवलं कोणा एकाच लेकरू आपल्या नावे खपवलं वठतंय पाहता खोटं पुन्हा पुन्हा गिरवलं परक्या प्रतिभेच देणं आपल्या माथी मिरवलं कौतुक पाहून मनात भलताच खुश झाला हे शेवटचं म्हणताना झाला एकच प्याला एकदा आत चुकचुकलं त्याने मनाला दटवलं जे जे मिळतं गेलं ते आपलं म्हणून गटवलं कळता कोणी विचारलं कोणी समजून चुकलं वाटलं ह्याला श्रेय आपलं मिळता मिळता हुकलं माणूस वाईट नसतो प्रतिभा असतें नेक बहरेल कशी बिचारी जर वृत्ती असेल फेक नजरेला नजर द्यायला असावं लागतं आपलं जे माझं म्हणून आपण जिकडे तिकडे छापलं क्षणात उतरतो माणूस स्वतःच्याही मनात लाख कबूल नाही केलं जरी कोणीही जनात इवलं असो,टिवलं असो भलं असो वा असो बुरं आपल्या प्रतिभेशी इमान हेच कलावंतातल खरं वेळ लागो बहरायला घडत चढत जाऊ आतून उमलून येता बहर डोळे भरून पाहू बहर डोळे भरून पाहू © कल्याणी बोरकर

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर